उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण आता अजितदादांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनीच पार्थ पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. यापार्श्वभूमीवर आज वाघेरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर
संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर राहिले आहेत. अजित पवारांचे ते विश्वासू मानले जात होते. पण आता त्यांनी अजितदादांची साथ सोडून उद्धव ठाकरेंसोबत जायचं ठरवलं आहे. त्यासाठी सकाळीच ते मुंबईत मातोश्रीच्या दिशेनं निघाले आहेत. आपल्यासोबत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांना घेऊन शक्तीप्रदेशन करत ते निघाले आहेत.
अजितदादांना सोडण्यामागचं वाघेरेंनी सांगितलं कारण
संजोग वाघेरे यांनी शिवसेनेत प्रवेशापूर्वी हा निर्णय घेण्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, आपण गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात आणि देशात जी अराजकता माजली आहे. तसेच संविधान बदलण्याचं काम या मंडळींनी हळूहळू सुरु केलं आहे.
त्याचबरोबर महागाईचा, बेरोजगारीचा प्रश्न आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन उद्धव ठाकरे हे याविरोधात चांगल्या पद्धतीनं आपली भूमिका मांडत आहेत. त्यांची भूमिका मला पटली त्यामुळं मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतंय वाईट
अजित पवार सध्या अशा लोकांच्या मांडीला मांडील लावून बसले आहेत, ज्यांच्याविरोधात आपण बोलत होतो. त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाईट वाटत आहे. त्यामुळं अजितदादांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचंही यावेळी संजोग वाघेरे यांनी सांगितलं. मावळ मतदारसंघात पार्श्व पवार समोर असतील तर पक्ष प्रमुख निर्णय घेतील त्याप्रमाणं लढू असंही वाघेरे यावेळी म्हणाले.