maharashtra News

Nashik News: सलग सुट्यांमुळे त्र्यंबकला उसळला गर्दीचा महापूर! दर्शनासाठी 7 ते 8 तास

वाढलेल्या गर्दीवर योग्य नियंत्रण न ठेवले गेल्याने आलेल्या भाविकांचे मात्र अतोनात हाल झाले.

त्र्यंबकेश्वर : शनिवार, रविवारला जोडून नाताळची सुटी आल्याने आज त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गुजरातसह इतर राज्यातील आणि स्थानिक भाविकांमुळे त्र्यंबकेश्वरचे रस्ते गर्दीने फुलले होते.

पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र होते. दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत असल्याने अनेक भाविकांनी तर मंदिराबाहेर लावलेल्या स्क्रिनवरूनच त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. दरम्यान वाढलेल्या गर्दीवर योग्य नियंत्रण न ठेवले गेल्याने आलेल्या भाविकांचे मात्र अतोनात हाल झाले. 

सलग सुट्यांमुळे भाविकांची काल रात्रीपासूनच गर्दी वाढत चालली होती. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. या रांगा सर्वच गल्ल्यांत पसरल्याने त्रंबकेश्वर येथे नक्की काय झालेय हे कोणासही कळेनासे झाले होते.

मंदिर बंद होईपर्यंत हा गोंधळ सुरुच होता. वृध्द व आजारी लोकांना आज सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. पूर्व दरवाजा बारी पहाटेपासून सुरू होती. तेथे भाविकांची रेटारेटी सुरु झाली. त्यानंतर समोरील पत्रा शेडमधून रांगा सुरू करण्यात आल्या.

तेथे लोखंडी पुलावरून वृद्धांना चढून उतरणे अशक्य होते. दोनशे रुपये दर्शनासाठी रांग चारही दिशांना असल्याने भाविकांना निश्चित दर्शन कुठून मिळते हे उमगत नव्हते.

गर्दीचा फायदा घेऊन सिनेमाच्या तिकीटाप्रमाणे फसवे मात्र जोरदारपणे कार्यरत होते.

व्हीआयपी लोकांचा राबता कोठी हॉलमधून अव्याहतपणे सुरू होता. त्यासाठी मर्जीतील लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी झालेला गोंधळ येथील नियोजनाची चूक दर्शवीत होता. बाहेरील राज्यातील भाविक रस्त्यातच डोके टेकवून माघारी फिरत होते.

दुपारी मात्र थोडा बदल झाल्याने रांगा हलू लागल्या, तरीही दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झालेला नव्हता. दरम्यान शहरात लॉजिंग व बोर्डिंग आज हाऊसफुल्ल होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *