मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलांना तीव्र विरोध करत राज्यातील ट्रकचालकांचा संप काल (मंगळवार) दुसऱ्या दिवशीही सुरू होता. पेट्रोलटंचाईच्या भीतीने काही ठिकाणी वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. ट्रकचालकांच्या संपामुळे राज्यात ४०० ते ५०० कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे.
राज्यात एकूण १५ लाख ट्रकची चाके थांबली आहेत. संपामुळे एका ट्रकमागे प्रतिदिन ३,५०० रुपयांचे नुकसान होत आहे. दरम्यान, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यासंदर्भात नुकतीच चर्चा झाली आहे, राज्य सरकार केंद्रासोबत चर्चा करेल. संपाबाबत योग्य तो तोडगा काढला जाईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
नाशिकमध्ये संप मिटला
नाशिक : उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तब्बल १२ जिल्ह्यांना इंधन पुरवठा करणाऱ्या पानेवाडी प्रकल्पातून १४०० टँकरची ठप्प झालेली वाहतूक मंगळवारी दुपारनंतर सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी वाहतूकदारांशी चर्चा करत त्यांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी चर्चा करत मनमाड येथे बैठक घेत तोडगा काढण्याच्या सूचना केल्या. मनमाडमधील इंधन डेपोतून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना इंधन पुरवठा केला जातो. या संपामुळे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली होती.
पोलिसांना माहिती देणाऱ्यावर कारवाई नाही
‘एखाद्या वाहन चालकाने अपघाताने एखाद्या व्यक्तीला धडक दिली आणि त्यानंतर तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले किंवा तातडीने पोलिसांना त्याची माहिती दिली तर त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कायदेशीर तरतुदींअन्वये कारवाई करण्यात येणार नाही,’ अशी माहिती केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
नव्या ‘हिट अँड रन’ कायद्यातील जाचक तरतुदींना आक्षेप घेत देशभरातील वाहतूकदार संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असताना केंद्र सरकारनेही याबाबत नमती भूमिका घेतल्याचे दिसते. सध्या वाहतूकदार संघटनांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांचे केंद्र सरकारने खंडन केले आहे. ‘अपघातानंतर जे चालक पोलिसांना माहिती न देताच पळ काढण्याचा प्रयत्न करतील केवळ त्यांच्यावरच कठोर कारवाई केली जाईल.
‘पोलिसांना अपघाताची माहिती देणाऱ्या चालकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येणार नाही. एखाद्या चालकाला अपघातानंतर जर आपण घटनास्थळी थांबलो तर आपल्यावर जमावाकडून हल्ला होईल, अशी भीती वाटत असेल तर त्याने तातडीने नजीकच्या पोलिस ठाण्यात जाणे अपेक्षित आहे. किंवा तोच चालक तातडीने आपत्कालीन क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधू शकतो आणि अपघाताची माहिती देखील देऊ शकतो,’ असे या अधिकाऱ्याने नमूद केले.
पोलिसांना सहकार्य करायला हवे
चालकाने अपघातानंतर पोलिसांना वाहन क्रमांक, दूरध्वनी क्रमांक आदींची माहिती देणे अपेक्षित असून गरज भासेल तेव्हा त्याने त्यांना चौकशीमध्ये सहकार्य करायला हवे. सर्वोच्च न्यायालयानेच अनेक खटल्याच्या सुनावणीदरम्यान ट्रक चालक हे बेजबाबदारपणे वाहने चालवितात आणि त्यामुळे अपघात होतात, असे निरीक्षण नोंदविले होते. अपघातस्थळावरून पळ काढणाऱ्या ट्रक चालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मतही न्यायालयाने मांडले होते.
संपाची सद्य:स्थिती
- मुंबई ः २२५ पेट्रोल पंप बंद; ८ हजार पैकी ८०० स्कूल बस सुरू, वाहन चालकांनी दीड तास अहमदाबाद महामार्ग रोखला
- सोलापूर ः मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घटली, भाव वाढले, पेट्रोलसाठी पंपांवर रांगा
- नाशिक ः शहरातील ७० टक्के व ग्रामीण भागातील ४० टक्के पंप बंद
- जळगाव ः शहरातील पाच पेट्रोल पंप इंधन उपलब्धतेअभावी बंद
- नागपूर ः इंधनटंचाईच्या भीतीने पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची सलग दुसऱ्या दिवशी गर्दी
- छत्रपती संभाजीनगर ः दोन ते तीन हजार ट्रक व अन्य मालवाहतूक वाहनांची चाके थांबली
- परभणी ः बहुतांश पेट्रोल पंप बंद, वाहनधारकांची तारांबळ
- हिंगोली ः जिल्ह्यात ५१ पैकी १५ पंपांवर पेट्रोल-डिझेलचा ठणठणाट, पेट्रोलसाठी रांगा