आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार बच्चू कडू यांची भेट झाली. या दरम्यान चांदूरमध्ये शरद पवारांच्या स्वागताचे आमदार बच्चू कडूंनी बॅनर लावले होते. आज बच्चू कडू यांच्या घरी सकाळच्या सुमारास शरद पवार पोहोचले. शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर आणि चर्चेनंतर आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना काय चर्चा झाली, आणि भेट का घेतली याबाबत सांगितले आहे. बच्चू कडूंनी शरद पवारांना चहाचे निमंत्रण दिल्यानंतर शरद पवार यांनी बच्चू कडू यांच्या निवासस्थानी गेले होते.
माध्यमांशी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, या भेटीमध्ये थोडी राजकीय, सामाजिक, आणि शेतीच्या संदर्भात चर्चा झाली. जास्त प्रमाणात शेती विषयावर आमच्यात चर्चा झाली. अमरावतीमध्ये किती मतदारसंघ आहेत. यांची माहिती त्यांनी घेतली. आम्ही त्यांना सांगितलं की पेरणी ते कापणी पर्यंत सगळी कामे एमआरजीएसमध्ये घेतली गेली पाहिजे. ते तुमच्या अजेंड्यावर असावे.
महाविकास आघाडीत जाण्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. ती एक भेट होती, दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महायुतीमधून कुठेही जाणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
आमच्या भेटीचे काहीही संकेत नाहीत. त्यांनी आमंत्रण स्वीकारलं ते महत्त्वाचं आहे. ते देशाचे नेते आहे. काही राजकीय चर्चा झाली तरी ते सांगण्याचे काही कारण नाही. बऱ्यात गोष्टी उघड करायच्या नसतात, तेवढं तार्तम्य ठेवलं पाहिजे, असंही ते पुढे म्हणाले आहेत.
‘मुख्यमंत्रीपदी शिंदे आहेत तोवर तोपर्यंत आम्ही सोबत आहोत’
“मदतीची जाणीव म्हणून त्यांना आम्ही भेटीला बोलावलं. अचलपूरमधील फिनले मिल मध्ये त्यांचं मोठं योगदान आहे, आमचा राजकीय पक्ष आहे. आम्ही काही समाजसेवी संस्था नाही. आमची जर राजकीय मजबूती वाटत असेल तर कुठला पक्ष नाकारणार आहे?. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत आम्ही सोबत आहोत, त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ” असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
“आमच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती सारखीच आहे. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत मुद्यासोबत गेलो. दिव्यांग मंत्रालय दिले म्हणून आम्ही एकनाथ शिंदे सोबत आहे. आमचे मुद्दे जर घेतले तर आम्ही महाविकास आघाडी सोबत जाऊ, आमचा प्रस्ताव महाविकास आघाडी आणि महायुतीला देखील देऊ. ज्यांनी आमची हे मुद्दे प्रामुख्याने घेतले आम्ही त्यांच्यासोबत जाऊ” असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.