Agnihotra Program Nashik : सदिच्छानगर येथील क्रिकेट मैदानात आज सूर्यास्त वेळी बरोबर ६ वाजून ३ मिनिटांनी अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशन शिवपुरी चे सांप्रत अधिकारी डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या उपस्थितीत शेकडो भाविकांनी
अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं न मम | आणि
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम ||
या मंत्रोच्चरांच्या साक्षीने सामुहिक अग्निहोत्र केले.
फाउंडेशन, अष्टविनायक मित्र मंडळ आणि माऊली संस्था, राजीवनगर यांच्यावतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी अक्कलकोट येथून ५०० अग्निहोत्र पात्र आणण्यात आली होती.
पिरॅमिडसारखा आकार असलेल्या तांब्याच्या पात्रात गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांपासून तयार केलेल्या अग्नीत, समंत्रक गायीचे तूप माखलेल्या दोन-दोन चिमटी अखंड तांदळाच्या आहुती देत अवघ्या पाच मिनिटात हा सोहळा पार पडला. मंत्रांच्या पठनामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते.
डॉ. राजीमवाले म्हणाले, की रूढी, परंपरा, आहार, विहार संस्कृती वेगळी असली तरी देखील विश्व मानवाच्या समस्या एकच आहेत. या समस्यांच्या उत्तरांसाठी संपूर्ण जग भारताकडे बघत आहे आणि त्यासाठी अग्निहोत्र रुपी मूळ भारतीय अध्यात्माची भूमिका घरोघरी नेण्याची गरज आहे आहे. श्रीराम आणि श्रीकृष्णाने देखील ही उपासना केली आहे.
मानव समाजाचे कल्याण या उपासनेतून व्हावे ही अपेक्षा आहे. ज्ञान देणारी ,दिशा देणारी प्रकाश देणारी ही जागा आहे हे समजून घेतले पाहिजे. ही अग्नीचे उपासना आहे. ईश्वराचे हे प्रत्यक्ष प्रतीक आहे. भारत ही वेदांची भूमी आहे. केवळ स्वतःच नाही तर आसपासचा समाज सशक्त आणि सुदृढ करण्याची शक्ती अग्निहोत्रामध्ये आहे.
श्रीराम मंदिराचे विश्वस्त सुधीर पुजारी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, अग्निहोत्र विषयावर पी.एच.डी. केलेले डॉ. योगेश वारे, उपनिषदावर प्रावीण्य असलेले आमोद विसेकर, हरिदास यशवंत आदी व्यासपीठावर होते.
महंत सुधीरदास म्हणाले की, यापूर्वीचा ग्रिनीज बुक रेकॉर्ड इंदूर येथे झाला असून ५१ हजार भाविक त्यात सहभागी झाले होते. नाशिकने पुढच्या ओळी तो मोडण्याचा संकल्प केला पाहिजे. अग्निहोत्र उपक्रम विनाखर्ची पर्यावरण संवर्धनाचा मार्ग तर आहेच शिवाय या आहुतीनिमित्ताने थेट परमेश्वराच्या सानिध्यात जाण्याचा राजमार्ग आहे.
डॉ. वारे म्हणाले की, वैदिक आचरण करणे म्हणजे अग्निहोत्र होय. प्रभू श्रीराम अग्निहोत्री होते यातून याची महंती कळते. निसर्गाच्या जवळ जाण्याचा हा विधी आहे. परमेश्वराजवळ जाण्याची ही साधना आहे. त्यामुळे बुद्धीचा विकास होतो. करंजकर यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
मराठी नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष विराज लोमटे, हरिदास यशवंत, प्रभुनंदन मुळ्ये, कृष्णामाई, देवांग जानी, डी. जी. सूर्यवंशी, बाळकृष्ण शिरसाठ, नीलेश साळुंखे, रवींद्र गामने, त्र्यंबक कोंबडे, शरद गीते, महादेव जवळकर, प्रदीप बनकर, मदन डेमसे, अभिजित खरोटे, संदेश एकमोडे आदींचा सत्कार करण्यात आला. श्री.गजानन महाराजांच्या पादुकांचे उपस्थितांनी दर्शन घेतले. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
संयोजक तथा ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी यांनी प्रास्ताविक केले. विलास पाटणकर यांनी सूत्रसंचलन केले. माजी नगरसेविका वंदना बिरारी यांनी आभार मानले. सुनील वाघ, ज्ञानेश्वर गोपाळे, नंदू आमले, पुरुषोत्तम पाटील, मनीष मोरे, रोहन नहिरे, सुधीर महाले, अविनाश गीत, अरुण मुनशेट्टिवार, कुणाल पाटील, बळिराम जाधव, सार्थक महाजन, बन्सील पटेल, दुर्गेश विसपुते, साहिल सोनावाला आदींनी संयोजन केले.
अग्निहोत्र करण्याचे फायदे
(सूर्योदय किंवा सुर्यास्तावेळी अग्निहोत्र कोणतीही व्यक्ती करू शकते.)
सूर्योदयाचे
सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम | आणि
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम || हे मंत्र आहेत.
जात-पात,धर्म, भाषा, देश, स्त्री-पुरुष ह्या भेदांपलीकडील ही उपासना आहे. खर्चही फारच कमी येतो. अग्निहोत्रामुळे वातावरण शुद्धी, मनःशांती व स्वास्थ, विचारांची स्पष्टता व विकारांचा समतोल रोगजंतूंचे निरोधन सोबत उर्वरित अग्निहोत्र भस्म हे उत्तम औषध व प्रभावी खत आहे.