छत्रपती संभाजीनगर : कन्नड पंचायत समिती अंतर्गत पाणंद रस्त्यांच्या कामात गैरप्रकार झाला आहे. याची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी न करता उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल शेळके पाटील यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
कन्नड तालुक्यात केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपये उपलब्ध होऊन सुद्धा स्थानिक अधिकारी, कर्मचारी अभियंते व लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रत्यक्षात काम न करता व किरकोळ माती टाकण्याचे काम करून कोटी रुपयांचा निधी लाटला जात असल्याचा आरोप जनशक्ती शेतकरी संघटनेने केला आहे.
केवळ ग्रामपंचायत स्तरावर अपहार होत नसून, पंचायत समितीच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात हात असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशी तसेच कारवाईबाबत विलंब व हलगर्जीपणा होत असल्याच्या आरोप शेळके यांनी केला.
भिंतीवरून आत येत अंगावर ओतले तेल
प्रशासकीय हलगर्जीपणाच्या निषेधार्थ शेळके यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या भिंतीवरून आत येत अंगावर तेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. यावेळी मोठा जमाव जमा झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला शेळके यांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. कन्नड तालुक्यातील बोगस रस्त्यांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी हे आंदोलन केल्याचे अनिल शेळके यांनी सांगितले.
कन्नड तालुक्यातील कुठल्या गावांमध्ये झालेल्या कामात गैरव्यवहार झाला आहे, याची यादी आम्ही संबंधितांना मागविलेली आहे. चौकशीची तयारीही केलेली असून शेळके यांना तसे कळवले होते.