ताज्या बातम्या

Akola News : पाणी टंंचाई आराखड्याचा मुद्दा गाजला; जलव्यवस्थापन समितीच्या सभेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

Akola News : संभाव्य पाणी टंंचाई निवारण आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याची मुदत संपली. परंतु त्यानंतर सुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे आराखडा सादर केला नाही. परिणामी ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणी टंंचाईला सामोरे जावे लागू शकते त्यासाठी कोण जबाबदार असेल?

असे प्रश्न जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढाऊ यांनी बुधवारी (ता. २७) जि.प.च्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात जलव्यवस्थापन समितीच्या सभेत उपस्थित केले. अद्याप आराखडा तयार न झाल्याने त्यांनी सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन प्रत्येक वर्षी पाणी टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात येतो. यंदा टंचाई निवारणाचा आराखडा संपल्यानंतर सुद्धा आराखडा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे या मुद्यावर बुधवारी (ता. २७) जलव्यवस्थापन समित्या सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.

यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांनी सांगितले की पातूर, मूर्तिजापूर, अकोला आणि बार्शीटाकळी पंचायत समित्यांमधून अहवाल प्राप्त झाला आहे, परंतु अकोट, बाळापूर आणि तेल्हारा पंचायत समित्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत.

त्यावर जि.प. अध्यक्ष अढाऊ म्हणाल्या की, पाणीटंचाईच्या कामाचा आराखडा तयार करण्यासाठी मी स्वत: दोन वेळा बैठका घेतल्या, तरीही अहवाल का आला नाही? उर्वरित पंचायत समित्यांकडून लवकरात लवकर अहवाल मागवून मला माहिती द्या, त्यानंतरच पाणीटंचाईच्या कामाचा अवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा.

सभेत अध्यक्ष संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती माया नाईक, स. आम्रपाली खंडारे, स. योगिता रोकडे, स. रिजवाना परवीन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, सदस्य मीना बावणे, संजय आढाऊ व इतरांची उपस्थिती होती.

चोरच चोरीची चौकशी कशी करणार?

मरोळा गावातील पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम न करता एमबी करून पैसे काढल्याचा मुद्दा जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत जि.प. सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. त्यावर जि.प.सदस्याने सांगितले की, चोरच चोरीच्या प्रकरणाची चौकशी कशी करणार.

गुड मॉर्निंग पथकाची कारवाई शून्य

उघड्यावर शौच करणाऱ्याच्या घटनांना आळा बसवा यासाठी पाणी व स्वच्छता विभागाने गुड मॉर्निंग पथकाचे गठन केले आहे. परंतु अद्याप जिल्ह्यात कारवाईला सुरुवात करण्यात आली नाही, अशी माहिती देण्यात आली. याबाबत उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *