सोलापूर : सोलापूर शहराचा पिण्याच्या प्रश्न मिटावा म्हणून १८७९ साली म्हणजे तब्बल १३९ वर्षांपूर्वी श्री रुपाभवानी मंदिराजवळ असणाऱ्या भवानी पेठ पाणी गिरणीजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्यात आला.
त्यासाठी जवळपास ८० फूट उंच बॉयलर उभारण्यात आला, जो आजही इतिहासाची साक्ष देत सुस्थितीत उभा आहे. पुरातन चुना आणि वीटा यातून हे बांधकाम केलेले आहे. त्यावेळचे कार्यकारी अभियंता जी. टी. बुर्क आणि सहायक ई. एफ. डायसन यांनी बॉयलर बांधण्याची किमया साधली होती.
फक्त विटा आणि चुन्याचा वापर करून भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात उभारण्यात आलेला उंच बॉयलर पाहिला, की बांधकाम क्षेत्रातील एक उत्कृष्ट कलेचा आनंद मिळतो. दिल्लीतील कुतुबमिनारसारखा दिसणाऱ्या या बॉयलरचा उपयोग हिप्परगा तलावातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या प्रक्रियेसाठी केला जात असे.
सुरवातीच्या काळात दगडी कोळशाच्या मदतीने फिल्टर यंत्रे चालविली जात होती. त्यानंतर डिझेलच्या साह्याने हे काम सुरू झाले. त्यासाठी केंद्राशेजारीच टाकी उभारण्यात आली. पुढे पुढे हे काम विजेवर सुरू झाले.
दोन लाख १६ हजारात बांधकाम
ब्रिटिश कालावधीत सोलापूर व नगर विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जी. टी. बुर्क व त्यांचे सहायक ई. एफ. डायसन यांनी या बॉयलरची उभारणी केली. ६ नोव्हेंबर १८७९ रोजी बॉयलर उभारणीच्या कामास प्रत्यक्ष सुरवात झाली आणि एप्रिल १८८१ मध्ये काम पूर्ण झाले.
या कामासाठी २ लाख १८ हजार ७९९ रुपयांची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात २ लाख १६ हजार ७३७ रुपये खर्च आला. खर्चात बचत करूनही टिकाऊ पद्धतीचे बांधकाम करण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. बांधकामाला १३९र्षे झाली आहेत.
पूर्वी सोलापूरला १२ बारा तास पिण्याचे पाणी यायचे. नंतरच्या काळात त्यात कपात होत गेली. या बॉयलरचे बांधकाम खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. चुना, गूळ व विटांचे काम आजही सुस्थितीत आहे.